Thursday, July 11, 2024

Fermi Paradox

 Wiki surfing (म्हणजे विकिपीडियावर एका विषयातून दुसऱ्या विषयावर स्वैर संचार) करत असताना Fermi Paradox बद्दल वाचत होतो, अतिशय interesting विषय आहे.

1. विश्वात इतरत्र जीवसृष्टी आहे का?  की आपण एकटेच आहोत?

2. इतरत्र जीवसृष्टी असेल तर आपला संपर्क का होत नाही?

या दोन महत्वाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरे पाहुयात.

आपल्या आकाशगंगेत जवळपास ५०० अब्ज तारे आहेत. ज्ञात विश्वात जवळपास तितक्याच दीर्घिका आहेत. शास्त्रज्ञांच्या मते यांत पृथ्वीसारखी संरचना असणारे १०० अब्ज अब्ज ग्रह असतील. यापैकी एकाही ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण झाली नसेल असे मानणे अवघड आहे. 

जर सजीव आहेत असे मानले तर प्रश्न पडतो की आपला त्यांच्याशी संपर्क का होत नसावा... याची अनेक कारणे असू शकतात. 

१. अनेक दूरस्थ ग्रहांवर जीवसृष्टी असेलही पण कदाचित ती अतिशय अप्रगत (microbes, bugs वगैरे) असेल. अथवा, प्रगत असली तरी जमिनीखाली अथवा पाण्याखाली वसलेली असल्याने त्यांच्याकडे अंतराळात संपर्क साधायचे तंत्रज्ञान नसेल.

२. अनेक शास्त्रज्ञ "ग्रेट फिल्टर" ही थिअरी मानतात. त्यांच्या मते मुळात "जीव" निर्माण होणे हीच एक अतिदुर्मिळ गोष्ट आहे. त्यापुढे जाऊन ते सजीव तांत्रिकदृष्ट्या विकसीत होणे हे कठीण आहे व त्याहीपुढे ते अतिप्रगत स्थितीत पोचणे हे तर महामुष्कील आहे.

 सुदैवाने आपण यापैकी दुसरा टप्पा बऱ्यापैकी गाठला आहे. अर्थात यापुढेही आपण आपसातल्या अणुयुद्धाने स्व-संहार करू शकतो, किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती ( १०+ रिश्टर स्केलचा भूकंप, super volcano, asteroid strike, solar flares, gamma ray burst अथवा - माझं आवडतं - कृष्णविवर) आपला विनाश घडवू शकते. यातून गाळणी होऊन पुढे गेलेल्या जीवसृष्टी फारच कमी असतील व त्या या अफाट अंतराळात एवढ्या विखुरल्या गेल्या असतील की एकमेकांशी संपर्क साधला जाणें आता अशक्यप्राय झाले असेल.

3. अनेक अतिप्रगत जीवसृष्टीनां आपल्याकडे लक्ष देण्याची गरज भासली नसेल. उदाहरणार्थ, समृध्दी महामार्गावरून ताशी २०० किलोमीटर वेगाने जाणाऱ्या कारड्रायव्हरचे रस्त्याच्या कडेला असलेल्या एखाद्या वारुळातील मुंग्यांकडे लक्ष तरी जाईल का?

४. कदाचित एखाद्या प्रगत सृष्टीने काही हजार वर्षांपुर्वी पृथ्वीला भेट दिली असेलही, पण तेव्हाच्या प्राणीमात्रांनां ते समजलंही नसेल. आधीच्या उदाहरणातील कार ड्रायव्हर खाली उतरून मुंग्यांशी बोलू लागला तर त्यांना ते समजेल का?

५. कदाचित इतर जीवसृष्टी असा संपर्क साधण्याच्या विरुद्ध असाव्यात. उगाच आपल्यापेक्षा अधिक प्रगत सृष्टीचे आपल्याकडे लक्ष वेधले जाऊन ते आक्रमण करायचे! स्टीफन हॉकिंग यांनीही - आपण संदेश पाठवू नये, ते आपल्यालाच धोकादायक ठरू शकते - असा इशारा दिला होता. 

एकूणच काय, तर ज्या दिवशी पृथ्वीव्यतिरीक्त इतरत्र जीवसृष्टी अस्तित्वात आहे (अथवा नाही!) याचा खात्रीशीर पुरावा मिळेल तो मानवी इतिहासातील सर्वात क्रांतीकारी दिवस असेल.

... हे आपल्या हयातीत घडेल का?




Wednesday, July 10, 2024

Venn Diagrams

 आपल्यापैकी बहुतेक जणांना Venn diagrams माहिती असतात. अनेकांना नांव माहीत नसलं तरी हे diagrams नक्कीच वापरले असतील. 

हायस्कूलमध्ये Pravin Concar  सरांनी या diagramsची ओळख करून दिली, तेव्हा indices, matrices वगैरे गुंताड्याने शिणलेल्या आमच्या चिमुकल्या मेंदूना ही चित्रं पाहूनच हायसे वाटले होते. नवीन गोष्ट सगळीकडे चालवायची या स्वभावानुसार मी माझा व (त्या महिन्याच्या) क्रशचां Venn diagram बनवला होता, त्यात आम्ही दोघं एका क्लासमध्ये आहोत याशिवाय दुसरं काही साम्यस्थळ आढळून आलं नाही. 

पुढे IT क्षेत्रात काम करताना याचा अनेकदा वापर होतोय. विशेषतः पहिल्याच कस्टमर मीटिंगमध्ये प्रॉडक्टची निरनिराळी फिचर्स ही Retail, Business, व Enterprise या तीन प्रकारांत कशी बसवायची याचा तोंडी बराच खल झाल्यावर Architech म्हणाला, "Guys, this is getting too much verbose, let's Venn it!"

 Venn diagrams मध्ये आपण दोन अथवा तीन गोष्टींचा एकमेकांशी परस्परसंबंध चांगल्याप्रकारे दाखवू शकतो. (चार किंवा जास्ती डेटासेट्सही वापरु शकतो पण मग ती आकृती किचकट बनते). 

 सोबत दोन Venn diagrams जोडले आहेत. पहील्या आकृतीत धोनी, विराट व रोहित यांनी भारतासाठी जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप्समधील सहभाग आहे. एक कुतुहलजनक गोष्ट म्हणजे धोनी अथवा रोहीतने जिंकलेल्या प्रत्येक कपमध्ये इतर दोघांपैकी एकाचा तरी सहभाग आहेच! 



दुसऱ्या ग्राफिकमध्ये लता-रफी-आशा-किशोर यांची solo व एकमेकांसोबत गायलेली गाणी दर्शविली आहेत. 



इथे एक प्रश्न आहे - या चौघांची duets भरपूर आहेत परंतु लता-रफी-आशा अथवा आशा-किशोर-लता असे त्रिकुटाचे एकही गाणें मला माहित नाही. जर कोणाला अशी गाणी माहीत असतील तर सांगा, मी हे ग्राफिक update करेन.

Tuesday, July 9, 2024

Brands for life

 "माणवी जीवन म्हणजे Lego खेळण्यापासून ते निरनिराळे logos वापरण्यापर्यंतचा प्रवास!" हे आदरणीय परममित्र श्री ऋषिकेश 'ऋषि'  उर्फ गझलखविसांचे कर्दनकाळ, सुट्टे-शेर- ए -हिंद,  यांनी (अद्याप न) लिहिलेले वाक्य मी बरेचदा रवंथ करत असतो.

वस्तुतः माझा आणि ब्रँडेड गोष्टींचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. दोन बॅगा समोर ठेवल्या तर त्यातील Chanel अथवा Gucci ची कोणती व सिताबर्डीच्या फुटपाथवरील कोणती हे कदापि ओळखता येणार नाही. वापरत असलेल्या अनेक वस्तूंचे ब्रँड्स बदलत गेले आहेत व ते लक्षातही राहिले नाहीत. पण काही गोष्टी मात्र अश्या आहेत की ते- ते ब्रँड्स एक अविभाज्य घटक बनून गेले आहेत. सोबतचं ग्राफिक अश्याच काहींबद्दल...

पहिलं घड्याळ म्हणजे दहावीच्या मेरिटसाठी आई-बाबांनी कौतुकाने घेतलेलं  टायटन सोनाटा. ते नंतर ग्रॅज्युएशनपर्यंत वापरलं. नोकरीला लागल्यावर स्वतःसाठी अशी एकमात्र खरेदी केली ती Titan Regalia या घड्याळाचीच. काही वर्षांपूर्वी Titan Xylys हे अप्रतिम गिफ्ट मिळालं. घड्याळांची - विशेषतः analog घड्याळाची - प्रचंड आवड असल्याने त्यासंबंधित बरेच कॅटलॉग वाचत असतो, पण यापुढेही घड्याळ घेतलं तर ते सुद्धा टायटनचंच राहील यात बिलकूल संदेह नाही.

कम्प्युटर्सच्या बाबतीत बोलायचं तर पहिला डेस्कटॉप assembled  केला होता. तो जवळपास पाच-सहा वर्षं upgrade करकरून वापरला. नंतर एक-दिड वर्षं Dell  Inspiron लॅपटॉप बडवला . 2010 साली Lenovo चा लॅपटॉप घेतल्यापासून दुसरीकडे बघितलं नाही. तो ९ वर्षं विनातक्रार कामी आला आणि आताचा Lenovo सात वर्षांपासून वापरतोय. 

 मोबाईल फोन वापराची सुरुवात अर्थातच नोकियाने झाली. 2003 ते 2009पर्यंत 1108, 3110 व N95 हे मॉडेल्स वापरले. स्मार्टफोन्स आले तेंव्हा 'काहीतरी वेगळं ट्राय करूया" म्हणून चक्क Windows Phone घेतला. मायक्रोसॉफ्टने त्याच्याकडे पूर्णच दुर्लक्ष केल्याने Motorola G series वर शिफ्ट झालो. आता जोपर्यंत Clean Android OS मिळत राहील तोपर्यंत Moto झिंदाबाद.


 आपण मॉडेल्स बदलत राहतो पण जर चांगली प्रॉडक्ट क्वालिटी व सर्व्हिस असेल तर अनेकदा आयुष्यभरासाठीचा कस्टमर मिळून जातो.